02 जुलै 2026
भारतीय रिझर्व बँकेने निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर, महाराष्ट्र
वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) दिनांक 30 जून 2026, रोजीच्या आदेशाद्वारे, निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., नागपूर, महाराष्ट्र (बँक) वर ‘एकल व गट कर्जदार/पक्षांवरील जोखीम मर्यादा आणि मोठ्या जोखमींवरील मर्यादा तसेच प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्टातील सुधारणा – युसीबीज् (UCBs)’ संदर्भात जारी केलेल्या काही निर्देशांचे आणि ‘पर्यवेक्षकीय कृती चौकट (SAF)’ या अंतर्गत जारी केलेल्या कार्यान्वयन सूचनांचे पालन न केल्याबद्दल ₹1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थिती वर आधारित बँकेची वैधानिक तपासणी आरबीआयद्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील आरबीआयच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये, सदर तरतुदींचे आणि निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा, अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, त्यानंतर सादर केलेले अतिरिक्त निवेदन आणि वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता आरबीआय, इतर गोष्टींबरोबर या निष्कर्षावर पोहोचली की आरबीआयच्या खालील निर्देशाचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.
पर्यवेक्षकीय कृती चौकट (SAF) अंतर्गत दिलेल्या निर्देशांचे पालन न करता, बँकेने:
-
काही प्रकरणांमध्ये, नवीन कर्जे व अग्रिमांसाठी एकल कर्जदार एक्सपोजर मर्यादा लागू असलेल्या नियामक मर्यादेच्या 50% पर्यंत कमी केली नाही; आणि
-
काही विशिष्ट ठेवींवर भारतीय स्टेट बँकेने देऊ केलेल्या दरांपेक्षा जास्त व्याजदर देऊ केले.
ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किंवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.
(ब्रिज राज)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2026-2027/597 |